गूळपोळी
संक्रांत आली की लहानपणीचे दिवस आठवतात. संक्रांत ते रथसप्तमी मस्त तिळाचे लाडू, वड्या, चिक्की, हलवा नुसते खात रहायचे दिवस.मग संक्रातीच्या दिवशी आई मस्त गुळपोळी बनवायची.हळदीकुंकाची वेगळीच मजा. आणि वाण काय मिळालं याची सर्वात जास्त ऊत्सूकता!!
मग आठवते ती लग्नानंतरची दुसरी संक्रांत. आम्ही तेव्हा नाशिकला राहत होतो. मोठ्या ऐटीत मी ठरवले की गूळपोळी करायची. सगळी तयारी केली.सारण छान झालंय असं त्याच्या रंगरूपावरून वाटत होतं. कणिक भिजवली आणि पोळी पण व्यवस्थित लाटली. तव्यावर टाकली आणि अरे देवा!!सगळीकडून ती पोळी फुटायला सुरू झाली. काय करावे काही कळेना. दुसरी पोळी करून बघितली तर तिचीही तीच गत!! तेव्हा काही आजच्या सारखे मोबाईल किंवा whatsapp पण नव्हते की पटकन आईला फोन केला व विचारलं. शेवटी त्या सारणाचे लाडू केले व साध्या पोळ्या केल्या. माझ्या नवरयाला पुढे बरेच दिवस मला चिडवायला हा विषय पुरला होता.
असो, पुढे मात्र मला गुळपोळी अगदी व्यवस्थित जमायला लागली.तर आज देत आहे माझी बर्याच वर्षांपासून करत आलेली रेसिपी, जी बिघडणार नाही याची मला खात्री आहे. मुद्दामच संक्रांतीच्या 2 दिवस आधीच रेसिपी देत आहे म्हणजे तुम्ह्लाला संक्रांतीच्या दिवशी पोळ्या करता येतील.
साहित्य व कृती-
कणिकेसाठीचे साहित्य-
1 वाटी मैदा
1वाटी गव्हाचे पीठ
2टेबलस्पून बेसन
चुटकीभर मीठ
साधारण 1वाटी कोमट दूध
4 टिस्पून तेल
सारणासाठी-
1/2 वाटी भाजलेले तीळ
1 वाटी गूळ
1/4 वाटी खसखस भाजून पूड केरून घ्यावी
1/4 वाटी खोबरयाचा कीस भाजून
1/4 वाटी बेसन
जायफळ किसून
तूप 2टिस्पून व पोळीला वरून लावण्यासाठी
1) छोट्या कढईत तेल कडकडीत गरम करून घ्या.
2) तिन्ही पीठं व मीठ एकत्र करून चाळून घ्या.
3) पीठाच्या मध्यभागी खोलगट जागा करून त्यात गरम केलेले तेल टाकावे व हे मिश्रण चांगले मळून घ्यावे. साधारणपणे जर हाताच्या मुठीत या पीठाचे मुटके वळले गेले तर तेलाचे प्रमाण व्यवस्थीत आहे असे समजावे.
4) आता यांत बसेल त्याप्रमाणे दूध टाकून नेहमीप्रमाणे कणिक भिजवून 2 तास झाकून ठेवावी.
5)तोपर्यंत सारण तयार करावे. यासाठी पॅनमध्ये तूप गरम करून त्यात बेसन खमंग भाजून घ्यावे (लाडूसाठी भाजतो तसे)
6) बेसन पूर्ण थंड होऊ द्यावे.
7) भाजलेले तीळ, खोबरं व खसखस मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे.
8) आता या मिश्रणात चिरलेला गूळ, गार झालेले बेसन व जायफळ टाकून हाताने व्यवस्थीत कालवून घ्यावे.
9)कालवत असताना मिश्रणाला तेल सूटले की समजावे मिश्रण तयार आहे.
10)आता या मिश्रणाचे 2-3 गोळे करून झाकून ठेवावे.
11) आता पोळी लाटायला घ्यावी. त्यासाठी भिजवलेल्या कणकीचे व सारणाचे मोजून सारखे गोळे करावे.
12)कणकीच्या एका गोळ्याचे दोन भाग करून त्याच्या छोट्या जाडसरपोळ्या लाटून घ्याव्या. एक पोळी आकाराने जरा मोठी लाटावी.
13) आता मोठी पोळी पोळपाटावर ठेवून त्यावर सारण पसरवावे व वर लहान पोळी ठेवून सगळीकडून त्याच्या कडा दाबून घ्याव्या आणि थोडा मैदा लावून हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी.
14)आता गरम तव्यावर पोळी टाकून दोन्ही बाजूने तूप लावून मध्यम आचेवर भाजून घ्यावी.
रेसिपी वाचून तुम्हाला जरी किचकट वाटली असेल तरीही step by step करून बघा. एकदम मस्त पोळ्या होतात.
आणि हो, "तीळगूळ घ्या गोडगोड बोला"!!☺☺













No comments :
Post a Comment